अंरुली वॉटर्स आणि मदर इंडिया सिनेमाच्या निमित्ताने 

भारतीय उपखंड अतिशय विशेष आहे. पृथ्वीवर इतरत्र कुठेही होत नसावा तसा एक मौसमी तांडव या प्रदेशात होतो, दर वर्षी, प्रत्येक वर्षी, गेले अनेक हजार शतकं! ज्याला आपण ‘इंडियन मान्सून’ म्हणतो, ज्याला इतिहासकार सुनील अम्रित ‘अंरुली’ म्हणजे नियमांना न जुमानणारा, बेलगाम, आपल्याच मस्तीत राहणारा असा मौसमाचा प्रकार म्हणतात. भारतीय मान्सून कश्या पद्धतीने या प्रदेशाला घडवत गेला आहे याचा अथांग मागोवा सुनील ‘अंरुली वॉटर्स’ या पुस्तकात घेतात. विशेषतः ब्रिटिश अधिकाऱ्यांनी याला समजून घेण्याचा प्रयत्न कसा केला आणि त्यातून पावसाचे/मान्सूनचे विज्ञान कसे वृद्धिंगत होत गेले तसेच जगामध्ये इतरत्र होणाऱ्या या विज्ञानाच्या विकासाचा भारतीय मान्सून समजून घेण्यावर कसा परिणाम झाला ह्याची मांडणी ते या पुस्तकात करतात. स्वातंत्रानंतर देशाने यामध्ये आणि त्याच्या माध्यमातून जल संसाधनांच्या विकासाचे आणि व्यवस्थापनाचे प्रयत्न कसे केले याबद्दल ते सांगतात. भारताच्या पाण्याविषयी आणि आधुनिक जल-मौसम विज्ञान समजून घेण्याची इच्छा असलेल्यांनी जरूर हे पुस्तक वाचावे. माझे लक्ष वेधून घेतले ते पुस्तकामध्ये उल्लेखलेल्या एका सिनेमाने- मदर इंडिया (नर्गिसचे आयकॉनिक फिल्मचे पोस्टर नाही माहित असा माणूस भारतात नसेल). १९५७ मध्ये, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर दहाच वर्षात मेहबूब यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट नक्कीच विशेष ठरतो. माझ्यासाठी हा पाणी, शेती आणि स्वातंत्र्याच्या तारुण्यात असलेल्या भारतातील घडामोडींचा मागोवा घेण्याचे एक महत्वाचा दुवा ठरतो.  म्हणजे मी तर अगदी म्हणेन की भारतातील विद्यापीठं, सामाजिक संस्था, शासकीय संरचना जेथे पाण्यावर काम होते, अध्ययन आणि शिक्षण होते, अश्या सर्वांनी या चित्रपटाचे (विशेषतः पहिल्या भागाचे) प्रक्षेपण करून चर्चा घडवून आणावी असा हा चित्रपट आहे. सुनील अम्रित यांचे पुस्तक वाचून झाल्यावर मी पुन्हा हा चित्रपट पहिला (लहानपणी कधीतरी टीव्हीवर बघितल्याचे धूसर आठवत आहे, पण नव्याने आणि नव्या नजरेने चित्रपट पहिला), आणि त्यातून जे उमगले, विचार पुढे आले ते या लेखातून मांडण्याचा प्रयत्न. 


चित्रपटाची सुरुवात 

गावातील काही पुढारी मंडळी एका म्हातारीकडे येऊन सांगतात की तुझ्या हातून गावामध्ये होऊ घातलेल्या नवीन कालव्याचे उदघाटन करायचे आहे. ही म्हातारी आजी म्हणजे चित्रपटाची मुख्य नायिका नर्गिस जिने आपल्या तारुण्यात अनेक हलाखीचे दिवस बघितले आणि जोखमीने शेती-पाणी व्यवस्थापन करून तिने गावाचा उद्धार केला. गावामध्ये येणारा कालवा हा त्या दशकातील भारताच्या जल संसाधन विकास आणि व्यवस्थापनाची गोष्ट सांगतो. १९३०च्या दशकात ‘द ग्रेट डिप्रेशन’ मधून बाहेर येणारा अमेरिका विकासाचे अनेक नवीन मार्ग धुंडाळत होता आणि त्यातूनच निर्माण झाले टेनीसी व्हॅली ऍथॉरिटी (टीव्हीए) हे मॉडेल. बेसिकली एका नदीखोऱ्याचा आणि त्यातील जल, जमीन आणि माती या संसाधनांचा विकास कसा करता येईल याचे ते मॉडेल होते. दुसरे विश्वयुद्ध संपले आणि कोल्ड वॉर सुरु झाला आणि त्यावेळी भारत स्वतंत्र झाला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना रशिया आणि त्याचे मॉडेल जवळचे वाटले आणि म्हणून त्यादृष्टीने देशाने विकासनीती बनवण्याची सुरुवात केली. जगामध्ये आणि विशेषतः नव्याने निर्माण होऊ पाहणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेला आपला दबदबा ठेवायचा होता आणि म्हणून त्यांनी आपली तज्ञता कामाला लावली आणि टीव्हीए सारखे मॉडेल आपल्या सहाय्य निधीच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये फोफावण्याचा प्रयत्न सुरु केला. असेच भारतामध्ये टीव्हीएच्या आधारावर दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन बनवले आणि त्याअंतर्गत अनेक धरणं बनवली गेली ज्यावर कालवे काढून देशाने शेतीच्या विकासाची वाट पकडली. भारतात ब्रिटिशसत्ता असतांना अनेक धरणांची निर्मिती झाली पण दामोदर व्हॅली ज्या पातळीवर आणि खर्चाने उभे केले, ते स्वतंत्र भारताचे आणि त्याच्या जल विकास नीतीचे एक प्रतीक बनले. 

मदर इंडिया मध्ये दाखवलेला कालवा आणि त्याचे उदघाटन हे या काळातील जल विकासनीतीचे द्योतक आहे आणि म्हणून याकडे चित्रपटातील एक सिन म्हणून फक्त न बघता त्यामघील इतिहास पुढे आणणे आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणे महत्वाचे ठरेल. यातून हे देखील अधोरेखित करता येते की स्वातंत्रानंतर भारताचा जल संसाधन विकासाचा ओघ हा मोठ्या, महाकाय, व्यापक अश्या धरणांवर होता. धरणांचे आणि त्यावर निघालेल्या कालव्याचे तत्व सोप्पे होते (तेव्हा वाटत होते) की शासनाने पाण्याची व्यवस्था करावी, त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर बनवावे, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे आणि त्यातून शेतीचा आणि देशातील ग्रामीण जीवनाचा विकास होईल. अर्थात १९६६-६७ मध्ये पडलेला मोठा दुष्काळ आणि त्यातून पुढे आलेले जल नीतीचे नवीन प्रश्न शासनाचे हे धोरण बदलण्यासाठी महत्वाचे ठरले आणि महाकाय, व्यापक रचनांकडून, स्थानिक, छोट्या स्वरूपाच्या विहिरी- भूजल संसाधन विकास नीतीचा अवलंब शासनाने केला. अर्थातच TVA सारख्या मॉडेल्सना ज्यांनी पुढे आणले त्याच आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजेच वर्ल्ड बँक, अमेरिकन संस्था आणि भारत सरकार मध्ये कार्यरत अधिकारी ज्यांनी हे सर्व जवळून पहिले, यांनी हा बदल करणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित केले (यावर कधीतरी वेगळे लिहीन). 

म्होटेनं पाणी काढणारा राजकुमार 

मुख्य नट म्हणून पुढे येणारा राज कुमार यामध्ये विहिरीतून म्होटेंने पाणी काढतांना आपल्याला एका चित्रात दिसतो. गम्मत अशी आहे कि चित्रपटाची सुरुवात कालव्याने होते पण विहिरींचा वापर किती सर्रास गावांमध्ये होता हे यामधून दिसते. आज आपल्याला म्होट, रहाट दिसणे तसे दुर्मिळच आहे पण चित्रपटातील हा सिन अनेक कारणांसाठी महत्वाचा आहे. चित्रपटानं अजून दोन ठिकाणी विहिरींचा उल्लेख आणि सिन येतो- एकदा जेव्हा नर्गिस आपल्या मुलाला (सुनील दत्त) पाणी आणायला सांगते आणि दुसऱ्यांदा म्हणजे जेव्हा गावातील बनिया सावकार सुखीलाला राजकुमाराच्या बैलांना ‘चांगले’ पाणी पिण्यासाठी म्हणून विहिरीवर घेऊन जा असे आपल्या नोकराला सांगतो. 

अनेकदा भारतातील भूजलाची विशेषतः शेती आणि भूजल याची चर्चा होते तेव्हा सुरुवात होते १९७० मध्ये पुढे आलेली हरित क्रांती. हरित क्रांती शक्य झाली ती फक्त काही बोटावर मोजता येणाऱ्या धारणांमुळेच नाही तर जागतिक बँक, फोर्ड फाउंडेशन, भारत सरकार पुरस्कृत वैयत्तिक विहीर योजनेमुळे. यामध्ये कमी व्याजाची कर्ज देऊन अनेक शेतकऱ्यांना विहीर देण्यात आली आणि त्यातून हरित क्रांती शक्य झाली, सुफल झाली. याचे कारण १९६० च्या दशकात झालेल्या दुष्काळात दडले आहे. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा कालवे कोरडे पडले, धरणं आतली पण उत्तर प्रदेश मध्ये जो सामूहिक भूजल स्रोत आधारित सिंचन प्रकल्प होता तिथे मात्र फरक पडला नाही आणि यातून शासनाला उमगले की शाश्वत आणि स्थिर अश्या सिंचनाचा स्रोत हवा असेल तर फक्त कालवे काढून चालणार नाही तर विहिरी आणि इतर भूजल स्त्रोतांची निर्मिती करावी लागेल. पण म्हणून फक्त हरित क्रांतीनेच भूजलाचे प्रस्थ निर्माण केले का? अश्या मांडणीमुळे विहिरींचा आणि समाजाचा त्यापूर्वीचा इतिहास मात्र धूसर होतो. प्रत्येक गावामध्ये विहिरी होत्या, कमी, पण होत्या. तसेच सामाजिक पाण्याचे स्रोत देखील विहिरीचं होत्या (फुलेंची गोष्ट लक्षात आहे ना?) मराठवाड्यात आड होते, इतरत्र जसे राजस्थान आणि इतर ठिकाणी बाव होत्या (इथे आरती राव यांचे मार्जिनलँड हे पुस्तक आठवते- त्यामध्ये पशुपालन करणारे राजस्थानातील अनेक समूह आणि त्यांची स्थानिक ज्ञान, पाण्याची समज याची चांगली मांडणी आहे), अशी एक समृद्ध पण विषमतेवर आधारित विहीर-बावडी-कुवा यांची सिस्टीम होती. 

मित्र करण याच्याकडून साभार 

चित्रपटातून हे देखील कळते की तोपर्यंत किर्लोस्करांचे पम्प अजून आले नव्हते आणि म्हणून शाश्वत अश्या बैलगाडे आधारित म्होट, रहाट यांची व्यवस्था होती (तुम्हाला माहित आहे, किर्लोस्कर आधी बैल रहाट देखील बनवायचे- फोटो बघा!). आमचे सर, हिमांशू कुलकर्णी, एक भूगर्भजल शास्त्रज्ञ म्हणून नेहमीच हे उदाहरण देतात आणि भूगर्भजल शास्त्रातील एक कन्सेप्ट – स्टडी स्टेट फ्लो, किंवा ज्याला equilibrium म्हणतात ही कश्या पद्धतीने रहाट आणि म्होट यांच्या माध्यमातून शक्य होते हे सांगतात. आज त्या कालबाह्य झाल्या आहेत कारण ऊर्जेची नवीन साधनं आणि संसाधनं निर्माण झाली आहेत. पण कन्सेप्ट समजावण्यासाठी, इतिहासात डोकावण्याची हे अतिशय महत्वाचे आहे.

अतिवृष्टी 

चित्रपटात एक सिन आहे- आपल्या मुलांना हाताशी घेऊन नर्गिस जमीन कसते, पीक उभं करते, पण उभ्या पिकाला अतिवृष्टीने झोडपले जाते. आज देशात अनेक ठिकाणी, राज्यात म्हणायचे तर मराठवाडा आणि इतर प्रदेशात अतिवृष्टीचे संकट उभे ठाकले आहे. चित्रपटात दाखवले जाते तसेच काहीसे आज आपल्याला सगळीकडे दिसते आहे, त्यातून शेतकरी हतबल होतांना दिसताय. हवामान बदल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागेल. हे करत असतांना शासन-प्रशासन, विविध सामाजिक संस्था, स्थानिक गट यांना एकत्र येऊन आखल्या जाणाऱ्या उपाययोजना उपयोगी ठरताय का याचा विचार करावा लागेल. अतिवृष्टीमुळे ज्या प्रदेशांना आजवर आपण दुष्काळ प्रवण, दुष्काळी म्हणून संबोधत आलो तिथे दुष्काळ-पूर यांचा एकत्रित सामना करण्यासाठी शेतकरी गट, गाव पातळीवरील संस्था यांच्या बळ देण्याची गरज आहे. 

Photo source: Hindustan Times

चित्रपट या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे लोक गाव सोडून जातांना आपल्याला दिसतात (नर्गिस एका सुंदर गाण्यातून त्यासर्वांचे मन वळवते). आज जगभरामध्ये हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज मुळे लोकांना आपले गाव, आपला प्रदेश, आपला देश सोडून जाण्याची वेळ येतेय. हवामान बदलातून होणारे हे मायग्रेशन फक्त स्थानिक, प्रादेशिक न राहता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण करत आहे. त्यातूनच अति-उजव्या विचारसरणीतून पुढे येणारे शासन अनेक देशांमध्ये आपल्याला दिसताय, आणि या शासनाच्या धोरणांमध्ये, नॅरेटिव्हमध्ये अश्या मायग्रंट, स्थलांतरित लोकांना प्रॉब्लेम म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतांना आपल्याला दिसताय (ट्रम्प यांनी तर अमेरिकेतील प्रत्येक संस्थेत आढळणारा क्लायमेट चेंज हा शब्दच हटवला आहे!). आज इतिहासात जितकी गरज भासली नसेल तितकी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक समन्वयाची गरज आहे- हवामान बदल ते करण्यासाठी आपल्याला सांगत आहे- पण आपल्याला दिसतंय की अनेक राष्ट्र, संस्था आणि सामाजिक संरचना अधिकाधिक संकुचित होताय. हे येणाऱ्या काळासाठी धोक्याचे ठरणार आहे. 

पीक पद्धतीतील बदल 

चित्रपटात अजून एक गोष्ट स्पष्टपणे पुढे येते ती म्हणजे पिकांची लागवड. अनेक शेतकरी गावामध्ये ज्वारी लावतांना आपल्याला दिसतात आणि चित्रपटातील अनेक सिन ज्वारीच्या विक्रीभवती फिरतांना आपल्याला दिसतात. हरित क्रांती आणि एकूणच शेतमालाचा बाजार यामुळे आपल्या पिकांमध्ये बदल झाला आहे. तो नुसता इन्कम, किंवा आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही पण स्वायत्तता या दृष्टीनेपण झालाय. चित्रपट दिसतं की नर्गिसचे कुटुंबीय ज्वारीसाठी भांडतात- सुखीलाला बरोबर- कारण त्यांना घरी खाण्यासाठी दाणा नाही. शेती बदलली पण त्याचबरोबर बदलली ती शेतमालाच्या विक्रीची गोष्ट. आता बाजारात कशाला भाव आहे हा प्रश्न महत्वाचा ठरतो, शेतकऱ्याला आपल्याला घरात दाणा आहे का- माझ्या घरी आपण काय खायचा- इतरांप्रमाणे आपण देखील विकत घेऊन खायचे अशी पद्धत झाली आहे. 

ज्वारीच्या रूपाने आपल्याला देशातील कोरडवाहू शेती आणि त्याचे महत्व देखील अधोरेखित होते. आज शासन millet mission राबवितांना आपल्याला दिसतंय- पण शासनानेच ही नाळ हरित क्रांतीतून तोडली हे स्पष्ट आहे. आता हरित क्रांती चुकीची आहे का असा प्रश्न मला विचारू नका- अर्थात १९५०-६० च्या दशकातील भारतात खायची वणवण होती- आता मुबलकच झालाय सगळं. त्यामुळे देश म्हणून आपण खाद्यपुरवठा सुरक्षित करण्यात यशस्वी झालो हे नक्कीच. आज पाऊस वरखाली झाला, दुष्काळ आला तरी उपाशी राहायची वेळ येत नाही (यामध्ये देशात निर्माण झालेली पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम- रेशन याचा खूप मोठा वाटा आहे). पण ज्या शेतकऱ्यांनी ७०च्या दशकात शासनाच्या सांगण्यावरून आपली पारंपरिक पीक पद्धती सोडली, आधुनिक शेतीची- अति पाणी- खत – बियाणं यांची वाट धरली, त्यांना आज शासन वाऱ्यावर सोडते आणि म्हणून ते शेतकरी आंदोलन करतात तर आपण त्यांना कशी वागणूक देतो हे नुकतेच आपण बघितले आहे. 

हवामान बदल, पाण्याची आणि मातीची खालावत जाणारी पातळी आणि गुणवत्ता यामुळे शेतीचे नवीन मार्ग, पद्धती किंवा जुन्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो हे यातून मांडता आले पाहिजे.  

शेतजमिनीचा विकास 

शेवटचा, पण अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी, शेती, उपजीविका यांचा खूप मोठा आणि महत्वाचा संबंध येतो तो म्हणजे जमिनीशी. जमीन, जमीन धारणा, जमिनीची गुणवत्ता ह्या सर्व गोष्टी शेती आणि शेती विकासाच्या प्रक्रियेत महत्वाच्या ठरतात. सुखीलाला कडून काढलेले कर्ज आणि त्यावर वाढणारा व्याज यामुळे नर्गिसच्या कुटुंबीयांची जमीन सुखीलाला बळकावतो. तिच्या कुटुंबाकडे पडीक, खडकाळ अशी एक ५ बिघा जमीन असते पण तिची गुणवत्ता असल्याने ते ती जमीन कसत नसतात. पण ओढवलेल्या या परिस्थितीमुळे आता त्यांना ती जमीन वहितीखाली आणण्यावाचून कोणताच पर्याय उरात नाही. अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने नर्गिस आणि राज कुमार ती जमीन कसण्यासाठी लायक बनवण्याच्या प्रयत्नात लागतात. दुसदैवाने त्यामध्ये मोठमोठाले खडक असतात आणि असाच एक खडक काढून बाजूला करण्याच्या नादात पहिले तर त्यांचा एक बैल जातो आणि नंतर राज कुमारचे हात जातात. हात गेल्याने स्वतःला निकामी समजण्याच्या विचाराने राज कुमार घर सोडून निघून जातो आणि संपूर्ण घराची जवाबदारी आता नर्गिसवर येऊन पडते. यातून सावरून ती जमीन चांगली करते आणि त्यावर आपल्या मुलांच्या मदतीने लागवड देखील करते.

भारताच्या शेती विकासामध्ये जमीन सुधारणेचा मोठा वाटा आहे. अनेक पडीक जमिनी, कमी पोत असलेल्या जमिनी कसण्यासाठी लायक बनवणे हे एक महत्वाचे धोरण शासनाने आखले. त्याचबरोअबर शेतकरी कुटुंबांनी देखील आपल्या जमिनी अधिकाधिक चांगल्या कश्या करता येतील ह्याचे प्रयत्न केले आहे. यामुळे शेतीवरील जमीन ही १९५१ ते १९९१ मध्ये जवळपास २० टक्क्यांनी वाढली. शेतजमीन विकास हा जसा जमीन विकास धोरणाचा भाग होता तसाच तो जल आणि मृदा संधारण कार्यक्रमांचा, धरणक्षेत्र विकासाचा आणि ग्रामीण विकास कार्यक्रमाचा देखील भाग होता. पण जमिनीचे स्वरूप कसे आहे आणि त्याचे वर्गीकरण कसे केले गेले आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकवावे लागेल. 

ब्रिटिश राज्यकर्ते किंवा त्याआधी भारतात असलेल्या विविध साम्राज्यांनी- मुघल, चालुक्य, मराठा, विजयनगर, आणि इतर- यांमध्ये शेतजमिनीवरील कर हे राज्य उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. ब्रिटिश आल्यावर त्यांनी कर नियोजनासाठी जमिनींचे वर्गीकरण केले- त्यामध्ये पडीक, पाणथळ, खडकाळ इत्यादी जमिनी निर्माण झाल्या. स्वातंत्रानंतर देशाने हे धोरण सुरु ठेवले आणि अश्या जमिनींना सुधारण्यासाठी योजना आणि कार्यक्रम आखले. महाराष्ट्र शासनाच्या १९६५ मधील कृषी विभागाने काढलेल्या मार्गदर्शिकेत कृषी विभाग प्रमुख श्री घाडगे काय म्हणतात पहा: 

वरील मजकुरात पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी कमी प्रतीच्या असतात आणि त्यांना सुधारण्यासाठी मोठा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने आखला हे यामधून अधोरेखित होते. 

पण यातून एक प्रश्न निर्माण होतो- या जमिनींबरोबर अनेक शतकं राहणाऱ्या, त्यांना जोपासणाऱ्या समूहांकडे, गावांकडे, शेतकऱ्यांकडे त्यांचे काही पारंपरिक ज्ञान होते का- आहे का? आणि असे असेल तर आजच्या हवामान बदलाच्या काळात त्या ज्ञानाचा पुनर्विचार आणि त्यावर आधारित कृती करण्याची गरज आहे का? लैला मेहता यांनी गुजरातमधील मेंढपाळ आणि इतर पशुपालक समूहांबरोबर केलेल्या अभ्यासातून असे आढळले की या समूहांना त्या प्रदेशात अनेक शतकं राहिल्यामुळे तेथील विशेष, क्लिष्ट संरचनांची एक ज्ञानसंपदा असते पण सरकार-शासन जेव्हा वरून काही योजना राबवते-लादते तेव्हा ते ज्ञान आणि त्याच्याशी निगडित पद्धती नामशेष होतात, मागे पडतात. आज आपल्यासमोर जेव्हा नवीन प्रश्न उपस्थित होताय तेव्हा आपल्याला एकमार्गी राहून चालणार नाही तर जगण्याच्या, निसर्ग सांभाळण्याच्या अनेक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. 

शेवट.. 

तसा पिक्चर दुसऱ्या भागात म्हणजेच इंटर्वल नंतर अगदीच बदलतो. एक त्रुटी जी अतिशय जाणवली ती म्हणजे समाजभान- जरी मेहबूब यांनी स्थानिक सावकार, त्यातून होणारे शोषण आणि इतर प्रश्न मांडले तरी जातवास्तव तितके प्रकर्षाने पुढे आलेले नाही. त्याबाबतीत मात्र चित्रपट कमी पडतो पण स्वतंत्र भारतातील पाणी-जमीन-शेती यावर सुरु झालेल्या कामांविषयी, त्यावेळच्या परिस्थितीविषयी अनेक बाजूंनी प्रकाश टाकतो- कथानकात या गोष्टींना विणणे तितके सोप्पे नाही पण मेहबूब यांनी ते केले आहे. हा चित्रपट भारतातच नाही तर संपूर्ण उपखंडात, विदेशात भरपूर गाजला.



Leave a comment